विजयरथ - विठ्ठल मंदिर हंपी

विजयरथ - विठ्ठल मंदिर हंपी


          सूर्याच्या मावळत्या किरणात, विठ्ठल मंदिराच्या प्रशस्त आवारात हा शिल्पकला व स्थापत्यकलेचा संगम बघणे म्हणजे डोळ्यांना एक पर्वणीच होती. कृष्णदेवरायाच्या साम्राज्यात बांधलेला हा दगडी रथ म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

         सोळाव्या शतकात विजयनगर साम्राज्य उत्कर्षाच्या शिखरावर होते. पूर्ण दक्षिण भारतात त्यांचे राज्य पसरले होते. सोने, चांदी, हिरे मोत्यांनी बाजारपेठा भरलेल्या होत्या. राजाची जहाजे म्यानमार, व्हेनिस, मक्केपर्यंत जाउन व्यापार करत होती. सोन्याचा धूर निघत होता.
          राजा वैष्णव होता आणि कोणार्क मंदिरातील कलाकृतीने प्रेरित होऊन त्याने ही अजरामर कलाकृती उभारायचा निर्णय घेतला. हंपीचे विठ्ठल मंदिर आणि गरूडस्तंभ असलेला विजयरथ.
          मंदिर स्थापत्यशास्त्राप्रमाणे विष्णू मंदिरासमोर विष्णूचे वाहन गरूडाचा खांब उभारला जातो. त्याला गरूडस्तंभ म्हणतात. हंपीच्या विठ्ठल मंदिरात मात्र गरूडस्तंभाऐवजी दगडी रथ उभारण्यात आला आहे.
           भारतात प्रसिद्ध असे दगडी रथ तीन ठिकाणी आहेत. महाबलीपूरमला पंचरथ , कोणार्कला सूर्यमंदिर व हंपीचा गरुडस्तंभ. बाकीचे दोन्ही रथ एका दगडात बनलेले व जागेवरून हलू नाही शकत. पण हंपीचा रथ चल आहे.
     सातशे टन वजन असलेला हा रथ जरी एकसंघ वाटला तरी अनेक भागात वेगळा करता येतो. त्याची चाके कमलाकार आहेत. समोर आधी दोन घोडे होते पण आता त्या जागी  दोन हत्ती आहेत. त्यांच्यामध्ये पुजाऱ्याला चढण्यासाठी पायऱ्या होत्या. आत विष्णूचे वाहन असलेल्या गरूडाची मूर्ती विराजमान होती.
           अशी  ही देखणी रचना नवीन 50 रूपयांच्या नोटेवर छापलीआहे.


Comments