मोजमाप

 झांटिपी: तुला महितेय बोक्या, आपल्याकडे वर्षातल्या प्रत्येक पोर्णिमा, आमावस्या आणि एकादशीला वेगळं नाव आहे? जसं मधु पोर्णिमा किंवा देवशयनी एकादशी. 

बोका: तशीही माणसं नावं ठेवण्यात एकदम पटाईतच असतात!

 झांटिपी: तुझा बोकार्झम बाजुला ठेवला तरी खरंय ते. मनुष्यजात जेंव्हा एक विषय जाणू इच्छिते तेंव्हा ती त्याला नावं देते, त्याला मोजते, त्याचं वर्गीकरण करते आणि तो विषय आपल्याला समजला अशी समजूत करून घेते. जसं एवरेस्ट. त्याची उंची किती, त्याचं नाव काय ह्यावरून वाद, जणू असं केल्यानं त्यांना एवरेस्ट समजणार आहे. 

अर्थात, कारागिरीमध्ये नाव देणं महत्वाचं आहे, कारण ती त्या त्या craft ची परिभाषा आहे. साड्यांच्या बुट्यांचे पंचवीस पेक्षा जास्त प्रकार आहेत. पान बुट्टा, कोयरी, डॉलर बुट्टा आणि कांजिवरम मधला मल्ली मोगु म्हणजे मोगऱ्याच्या कळीचा बुट्टा. 

बोका: नेबुकादनाझेर!

झांटिपी: कसला वाईट शिंकलास तू!

बोका: ए बावळट. नेबुकादनाझेर हा बाबिलोनिया चा दुसरा सम्राट होता. 

झांटिपी: त्याचा इथे काय संबंध?

बोका: आहे ना! अग शॅंपेनच्या बाटल्यांना, त्यात किती लिटर शॅंपेन आहे त्याप्रमाणे वेगवेगळी नावं आहेत.  आणि मोठ्या बुधल्यांना, जुन्या करारातल्या म्हणजे old testament बायबलमधल्या patriarchs  म्हणजे पूर्वजांची नावं आहेत.  १६ लीटर चा बाल्थाझार,  २0 लिटरच्या बुधल्याला नेबुकादनाझेर, २४ लिटरचा सोलोमन. 

 झांटिपी: (हसत) आपल्या इथल्या वाईन शॉपमध्ये "एक  नेबुकादनाझेर दे" असं म्हणलं तर त्याचा चेहरा कसा होईल ना!

बोका:  दुकानात यायच्या आधीच चढलीय असं वाटेल त्याला. 

झांटिपी: ए, आपल्याला जर चहाच्या वेग वेगळ्या कपांना नावं द्यायची तर कायबरं नावं देता येतील? हल्ली जो इटुकला प्रसाद वाटीपेक्षा लहान कप मिळतो त्याला "घुट्टीका किंवा चुल्लू" म्हणावं.

बोका: कटींगला - "यारी किंवा टपरी"

झांटिपी: रविवारी सकाळी तमाम बाबा लोक  थोड्या थोड्या वेळाने "अग जरा चहा मिळेल का?" असं म्हणत तीन तीन कप पितात त्याला "अहो"  म्हणू शकतो.  

बोका: कॉफीच्या प्रमाणांना मात्र intellectual किवा रोमांटिक नावं द्यावी लागतील.  आमोलिका किंवा तृषांतिका अशी. 

झांटिपी: किंवा एक "आणि बरेच काही" द्या  असं

बोका: का बरं तुला "कॉफी आणि बरेच काही" टोचतो सारखा? 

झांटिपी: अरे तरं नाही. तो छान चित्रपट आहे. मला लोकांच्या कल्पनाशुन्यतेचा राग येतो.  तो सिनेमा चालल्यापासून पुण्यातल्या सगळ्या दुकानांची नावं त्याच पॅटर्नवर. आपल्या शेजारच्या गल्लीतल्या फळाच्या दुकानाचं नाव "डाळींब आणि बरंच काही" ठेवलंय!  I kid you not! 

आपल्या लेखिकेला सांगूया, तिच्या वाचकांना विचारायला, की "चहा आणि कॉफीच्या विविध प्रमाणांना तुम्ही काय म्हणाल? जसं स्टारबक्स मध्ये Tall or Grande असतं तसं "

बोका: अर्थात तिला जर वाचक मिळाले असले तर ... 





Comments