काक: कृष्णः पिकः कृष्णः

 झांटिपी  खिडकीतून शोधक नजरेने बघत आहे, बोका दिवसातली साडेआठवी गोलकुक्षी संपवून अंग ताणत खिडकीपाशी येतो.

बोका: काय ग, काय एवढी वाकून बघतेस खिडकीतून? 

झांटिपी: अरे, ती लेखकीण कुठे दिसतेय क बघत होते. बऱ्याच दिवसात काही लिहिलं नाही आपल्यावर, आणि दिसली पण नाही मला कुठे!

बोका: अग, लाईक्स - शेरे मिळेनासे झाल्याने थांबवलं असेल तिनं, माझं तरल आणि हुशार बोलणं सामान्यांना कुठे समजणार? बरं ते जाऊ दे, तू खिडकीतून बघत होतीस, तेंव्हा तुला काळी जाताना दिसली का? 

झांटिपी: सर्जा! असं कोणाच्या कमीपणावर नये बोट ठेवू! असं काळी म्हणू नये कोणाला!

बोका: ए माणूस बाये! एकसक्यूज मीच बरका! कोणाचा कमीपणा? सगळ्या मांजरात देखणी आहे माझी काळी! माझी दिल की धडकन!  इतर एकाही भाटीला तिच्या मागच्या पंजाच्या नखाची सर नाहीये! 

झांटिपी; ओह, ती डेस्डेमोना कॅट होय समोरच्यांची? मला वाटलं शर्वरी नाहीतर निकिताला काळी म्हणतोयस तू!

बोका: झांटिपे, तुम्हा माणसांसारखी दांभिक जात नाही बघ जगात! मनात सगळ्यांच्या असतं पण "काय बोलायचं नाही" ह्याचे शिष्टाचार बनवतात लेकाचे. बुटकं म्हणायचं नाही, काळं म्हणायचं नाही! अरे! बुटके ही आकर्षक असतात, टिरीयन लॅनिस्टर सारखे. आणि काळा हा मस्त तुकतुकीत रंग आहे. हा बदल विचारात घडायला हवा.  तरी बरं ह्यांचा देव कृष्ण, ह्यांची द्रौपदी कृष्णा, जिच्यासाठी महाभारत होतं! का हा पण अजून एक दांभिकपणा? संस्कृत मध्ये कृष्ण म्हणलं की चालतं! हिप्पोक्रीट लेकाचे! 

झांटिपी( ओशाळून): तसं खरं आहे म्हणा तुझं, हे नका म्हणू आणि ते नका म्हणू हीच आमची सुधारणा! एक टिकमार्क म्हणून करतो उपाय आम्ही. रात्री ११ ते ७ चा कर्फ्यु, आणि फेअर ऍंड लव्हलीचं नाव बदलून ग्लो ऍंड लव्हली! मनातून काही समज जात नाही! 

बोका(शांत होत): पटलं ना माझं म्हणणं तुला? 

झांटिपी: हो बाबा!

बोका (बेफिकिरीने आपल्या पंजाकडे बघत): मग तुला जाडे अशी हाक मारली तर चालेल?

(ठॉक असा जोडा फेकून मारल्याचा आवाज, आणि तो चुकवून पळून गेलेल्या बोक्याचं मिश्कील हास्य!) 


Comments