कॉल

 बोका खिडकीतून आत येणाऱ्या उन्हाच्या त्रिकोणात पहुडलेला आहे. मधूनच बोकेरी आवाज काढत आहे. 

झांटिपी: काय रे असा गुदगुल्या केल्यासारखा हसतो आहेस? like the Cheshire Cat!

बोका (एक पलटी मारून अजुनही हसतच) अग इथल्या Common Drongo ला भेटायला त्याचा जंगलातला चुलतभाऊ Greater Racket-tailed Drongo आलाय. त्याच्या सुरस गोष्टी ऐकतोय. मजेशीर आहेत मोठ्या. 

झांटिपी: Common Drongo  म्हणजे कोतवाल पक्षी ना रे.  त्याची भाषा कळते तुला? (इथे बोक्याने तिला Obviously! असे म्हणणारा लूक दिला) काय म्हणतोय तो? 

बोका: तो जंगल सफारीला येणाऱ्या माणसांच्या गमती सांगतोय. कसे सगळे लष्करी कपडे (camouflaged) घालून, तोफेएवढ्या भिंगाचे कॅमेरे, दुर्बिणी घेऊन येतात. 

त्यांना फक्त वाघ बघण्याची घाई असते. आजुबाजुला एवढं सुर्यप्रकाशाने लखलखलेलं, इतक्या तऱ्हेच्या प्राण्या-पक्ष्यांनी भरलेलं जंगल असतं, त्याकडे त्यांचं लक्षच नसतं! पाऊण जंगल तर त्यांच्या क्षीण नजरेला दिसतच नाही म्हणे.  

कहर म्हणजे माणसांच्या मते ते अजिबात आवाज करत नसतात, जेणेकरून वन्यजीवांना त्यांची चाहूल लागू नये! Drongo bhaau is like "Please!!  एकतर ते त्या रणगाड्यांमध्ये बसून येतात, शिवाय  सतत  इतकी खस्फस, कुज्बुज, क्लिक्लिक करत असतात, की नुकतं अंड्यातून बाहेर आलेलं  पिल्लू पण शंभर पंख दुरून ओळखू शकेल."

 तुला माहिती म्हणून सांगतो, प्रत्येक species चं अंतर मोजण्याचं परिमाण वेगळं असतं.  पंखाची  एक झाप किंवा  पळतानाची एक ढांग असं.  पक्ष्यांचं अंतर द्विमीत असतं - लांबी आणि उंची अंतर्भूत असलेलं. असो यावरून  माझी मापं तू नको काढू तू आत्ता.  

आणि एक गम्मत सांगत होता तो. त्या गाड्यात पुढे एक स्वत:ला जंगलतज्ज्ञ म्हणवणारा guide असतो. अतिशय नाटकीपणे तो चालती गाडी थांबवतो, सगळ्यांना गप्प बसवतो आणि ऐकायला सांगतो, "call येतोय, माकड - मोर आवाज काढतोय. वाघापासून प्राण्यांना सावध करायला" मग ती गाडीभरून जनता - गबाळे एकाग्र चेहरे करून इकडे तिकडे पहात वाट बघते. मोठं प्रेक्षणीय दृष्य असतं ते" खरं तर आसपास असलेल्या वाघाला ते माकड - जवळ आहे गाडी जाऊ नकोस असं सांगत असतं. मग शहाणं जनावर अजिबात बाहेर पडत नाही. गाडी गेली की all clear चा कॉल येतो. "वाघुबाईची हौस नडे | वाघुबाई मिरवे सफारी पुढे|" not so old jungle saying... इति ड्रॉंगोभाई.  

भाई म्हणाला "दोन पायाचा, न उडू शकतो, ना धड पळू शकतो, ना कुठलं शिकारीचं - बचावाचं साधन. ना पंजे ना शिंग - जंगलात एकटा आला तर एक दिवस नाही टिकणार."  

झांटिपी: असंच असतं बोक्या! केप कामोरीनला आलेल्या वास्कोला पांढराफटक मानसून आणि हगवणीने हैराण बिचारा समजून एत्तदेशीय गाफिल राहिले. जंगल पण माणसाला बिचारा समजून आपल्यातच दंग राहिलं. वेळेतच माणसाच्या टोळीला आपल्या चड्डीत ठेवायला हवं होतं त्यांनी, म्हणजे आसं माणसानं दिलेल्या अभयावर अभयारण्यात नसतं रहावं लागलं!  (आवाज जरा रडीला आला तिचा) खरं पाशव ना असं निरागस दिसतं, आणि सज्जन त्याला निरुपद्रवी समजून नाश पावतात.

बोका: (दचकून) अग, किती आवाज चढला तुझा! भाई उडून गेला ना घाबरून! 


Comments