माया

 सगळीकडे एक गंभीर शांतता. बोका, सगळ्या दुनियेकडे पाठ फिरवून भिंतीला नाक लावून बसलेला होता. 

नुसत्या स्तब्ध बसण्यात ही त्याच्या शरीरातून नाराजीच्या लाटाच्या लाटा उसळत होत्या. 

झांटिपी: काय रे, का चिडलायंस, आज कॅटफूड पुरेसं नव्हतं की ताटली नीट स्वच्छ नव्हती? 

शांतता... 

झांटिपी: (कृष्णधवल मराठी चित्रपटातल्या,  एक बट कपाळावर बरोबर डोकावेल, असा लहरिया फेटा बांधलेल्या चंद्रकांत च्या रोमॅंटिक(!) आवाजात): एक माणूस रागावलंय वाटतं आमच्यावर!

शांतता... 

झांटिपी: (शफ़ाकत अमानत अलींची क्षमा मागून) मोरा बोका मोसे बोलेना! मैं लाख जतन कर हारी! मोरा बोका मोसे बोलेनाऽऽ

बोका:(अंतत: मौन सोडून पण भिंतीकडेच बघत) ए बाई कितीवेळा सांगितलं तू गाऊ नकोस! हो मी रागावलोय तुझ्यावर. तू खाली गेली होतीस तेंव्हा त्या रॉक्याचे लाड करत होतीस. 

झांटिपी: ओह! म्हणून चिडलायंस होय! अरे गोड आहे तो भुभु बच्चा! 

बोका: काय पण प्रेम त्या बिनडोक कुत्र्यावर! एकमेकावर आपटायला सुद्धा दोन विचार नसतील त्याच्या डोक्यात! 

झांटिपी: कसंय ना सर्जा,  ती बौद्धिक चमक वगैरे ठीक आहे, पण,  कोणीतरी - फक्त तुम्ही तुम्ही आहात म्हणून,  तुम्ही दिसलात म्हणून खूश होतं -ती खुशी इतक्या उत्साहाने दाखवतं. हे इतकं सुखवणारं असतं ना!
स्वत:च्या फायद्याव्यतिरिक्त तुमची कोणतीच दखल न घेणाऱ्या  जगात, माणसाला असं विनाअट प्रेम हवं असतं. खरंच हवं असतं.

बोका: पण तुसड्यासारखं वागत असला, तरी बोक्यालाही आपल्या माणसांनी आपण सोडून  इतर कोणाकडे बघूही नये असं वाटू शकतं!

(छज्ज्यातल्या खुर्चीत झांटिपी, तिच्या अंगावर रेलून बसलेला  बोका खाली खेळणाऱ्या रॉकीकडे पहात आहेत.)


Comments