बाजीचा ए अतफाल


(झांटिपी पुस्तक वाचत होती. तिनं पुस्तक मिटलं आणि एक लिरिकल निःश्वास सोडला.)

बोका: काय संपलं का पुस्तक? 

झांटिपी: अरे, काव्यसंग्रह आहे हा. तो जपून आस्वाद घेत अनुभवायचा असतो. एखाद्या जुन्या प्रियकराच्या प्रेमपत्रासारखा. 

बोका: ते कविता प्रकरण काय जमत नाही बा आपल्याला. कविता वाचताना असं वाटतं की कवीला काहीतरी समजलय, असं त्याला आपल्याला दाखवायचंय पण काय ते समजू द्यायचं नाहीये.

झांटिपी: हाय कंबख्त तुने तो पी ही नही! शायरी समझने की नही महसूस करने की चीज है, या तो आप महसूस करतें हैं या नही| मी काही तुला convince or convert करणार नाही. 

प्रतिभावंत कवी आपली कल्पनासृष्टी काळाच्या पलिकडे जाऊन तुमच्या पर्यंत पोचवू शकतो. खरं अक्षर वाङमय आहे ते.  

आपले आवडते कवी असे मनात असावेत, आपल्या मूडला साजेश्या ओळी आपल्या मनात तरंगतात, आणि हाताशीच असलेला संग्रह उघडून आपण ती कविता परत अनुभवावी. 

बोका: आत्ता तुझ्या मनात कुठली ओळ आली?

झांटिपी: 

बाजीचा-ए-अतफाल है दुनिया मेरे आगे
होता है शब-ए-रोज तमाशा मेरे आगे. 

बोका: वाह! वाह! वाह वाह!

झांटिपी: कळलं का तुला, गालीब काय म्हणतोय ते? 

बोका: नाही ना, म्हणून तर वाह वाह केलं! कळलं असतं तर समीक्षण केलं असतं! बाजीचा-ए-अतफाल म्हणजे काय?

झांटिपी: बाजीचा-ए-अतफाल म्हणजे लहान मुलांचा खेळ. 

बोका: म्हणजे  गालीब म्हणतोय की,  नुसता खेळ आहे ही दुनिया!, रोज एक नवा विषय(!) होतो इथे! माझ्या मूडला एकदम चपखल बसतंय हे. 

झांटिपी: बरोबर! आणि हे त्यानं म्हणून ठेवलंय साधारण दिडशे वर्षांपूर्वी!  आणि त्याच्या आधी दोनशे वर्ष,  आपल्या आध्यत्मिक कृपाळु वाणीने संत रामदास सांगतात:

दास डोंगरी राहतो 
जत्रा देवाची पाहतो.

Comments