टांगासवारी
झांटिपी(चलध्वनीवर(मोबाईल) पानं उलटत): सर्जा, तुला संगीतकार ओ. पी. नय्यर माहित आहेत का?
बोका(पहुडल्या जागी एक डोळा किलकिला करत): "मांग के साथ तुम्हारा, मैने मांग लिया संसार" वाले ना? हो. माहित आहेत. पण तुला आत्ता का आठवले? तुला whatsapp वर त्यांच्याबद्दल एखादी सुरस आणि चमत्कारिक गोष्ट पाठवली का कोणी? 'पान खाऊन थुंकताना कशी एखाद्या खांसाहेबांनी त्यांची धुनसमस्या सोडवली होती, किंवा, लहानपणी साक्षात सरस्वतीने त्यांना आपली वीणा प्रसाद म्हणून दिली होती असं काही?'
झांटिपी: च्यक, नाही रे! अश्या एक दोन प्रक्षेपणांच्या सत्यतेबद्दल मी जाहीर शंका व्यक्त केली. तेंव्हा त्या प्रक्षेपकांनी "माझ्या मैत्री आणि भावनांपेक्षा तुला सत्य जास्त मोलाचे वाटते?"असा भावनिक आक्षेप घेतला, तरीही अधिक लाउन धरल्याने मला त्या मंडळींमधुन डच्चू मिळाला. आता मी अश्या सुरस कथांना कायमची मुकले.
बोका: अरे, अरे! तुला ना लोकांना कसे हाताळावे ह्याचे संकेत अजिबात कळत नाहीत.
झांटिपी: हे तू मला म्हणावंस!
बोका: हे बघ, स्वत:ची तुलना तू माझ्याशी करू नकोस. मी बोका आहे. I can afford to be what I am! खूप मोल देऊन आणि निंदा पत्करून आम्ही हा हक्क मिळवला आहे. बरं ते सोड, ओ. पी. चं काय ते सांग.
झांटिपी: तुला ओ. पी ची खासियत माहित आहे ना? त्यांच्या बहुतेक गाण्यांना घोड्यांच्या टापांचा ठेका आहे. "जरा हौले हौले चलो मेरे साजना", "देखो कसमसे देखो कसमसे" अशी अनेक. मी जेंव्हा मध्यमवयाच्या किंवा वयस्कर लोकांनी लिहिलेल्या आणि प्रक्षेपित (forward) केलेल्या नोंदी वाचते तेंव्हा मला ओपींच्या ठेक्याची आठवण येते. ही सगळी मंडळी टांग्यात बसुन आयुष्याचा प्रवास करत आहेत असं वाटतं, सतत मागे बघत. निव्वळ nostalgia! लहानपण आहाहा! वाडा आहाहा!चाळ आहाहा! शाळा आहाहा! सगळं रमणीय. अरे खरपूस मार, संडासाच्या लायनी सोईस्कर विस्मरण! निघाले आपले टॉक टॉक करत!
बोका(एकदम उठून बसत): वाह! आपने याद दिलाया तो हमे याद आया! काय टांगे होते आमच्या वेळी. डौलदार, मोठ्या चाकाचे, अबलख घोडा जोडलेले. टप टप टाकीत टापा! मी शाळेतून येताना असा पाय हलवत "मुसाफिर हूं यारो, न घर ना ठिकाना" असं म्हणायला लागलो की आजुबाजुच्या घरातल्या बाया माझ्या अलाबला घ्यायच्या आणि बाबू टांगेवाल्याचा टांगा असा देखणा होता, त्याची सर तुमच्या बेंटली आणि लंबरगिनीला येणारच नाही!
झांटिपी(कोपरापासून नमस्कार करत): बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी, मेरे जिंदगीमें हुजूर आप आये!
Comments
Post a Comment