निसर्गनियम
वसंत संपात समय प्राप्त झाला होता. झांटिपीच्या छज्जावरच्या चिमुकल्या फुलबागेत फुलेच फुले फुलली होती. रंगबिरंगी गुलाब, जास्वंद आणि बरेच काही..(अचानक बरेच काही, बरेच काही झालंय .. मिसळ आणि बरेच काही ते चुर्मुरे आणि बरेच काही पर्यंत असो..). झांटिपी कडक कॉफीचे घुटके घेत हे कौतुकाने बघत होती.
छज्जाजवळच एक भलं मोठं शोभेचं खोटं हुबेहुब झाड पण धुळ खात उभं होतं. बाहेर फुलांवर येणारं एखादी चुकार फुलचुसी, एखादा शिपाई बुलबुल ह्या झाडाकडे पण चक्कर टाकत असत. आणि आज तर एका बुलबुल जोडीने त्या झाडात घरटं बांधायला काढलं आहे. बुल आणि बुली मोठ्या लगबगीने कुठून कुठून काड्या, पानं, एखादं प्लॅस्टिक कागद आणत घरबांधणी करत होते.
जणू निसर्ग मोठ्या जोमाने झांटिपीचं अवकाश काबीज करत होता. आणि ह्या हक्काच्या चढाईने, बुलबुलांना तिच्यावर वाटलेल्या विश्वासाने झांटिपी एकदम सुखावली. ती गाणं गाऊ लागली.
झांटिपी: 'केतकी गुलाब जुही चंपक बन फूले ... ऋतु बसंत अपनो कंथ गोरी गरवा लगाये... केतकी गुलाब जुही..'
बोका: नको ग बये नको गाऊस. नको त्या सुंदर गाण्याचा खून करूस. (बोका एकटक घरट्याकडे बघत, एकीकडे बोलता झाला)
झांटिपी: (एकदम गाणं थांबवत) असूदे हम निर्मल आनंद के लिये गाते है!
अचानक झांटिपीला बोक्याच्या नजरेची दिशा आणि त्याचा नजरेतली चमक जाणवली.
झांटिपी: बोक्या, काय बघतोयस रे तू.
बोका: (नजर हटवत) कुठे काय?
झांटिपी: हे बघ तुला सांगतेय, पक्ष्यांकडे, घरट्याकडे अजिबात वाकड्या नजरेने बघायचं नाही. त्यांच्यावर डोळा ठेवायचा नाही!
बोका(साळसूदपणे झांटिपीकडे बघत): अरे वा असं कसं? निसर्ग जसा त्या पाखरांना प्रेरणा देतो घरटं बांधायची, अंडी घालायची तशी मला ही माझी उर्मी देतो ना, झडप घालायची! तू का त्यांची बाजू घेतेस, का ढवळाढवळ करतेस? मी पण निरागस दिसू शकतो!
झांटिपी: आप्पलपोटा आहेस तू बोक्या!
Comments
Post a Comment