पुस्तक
झांटिपी: अरे हे बघ interesting app. हे अॅप पुस्तकांचा सारांश काढून देतं, तेवढं वाचलं की झालं
बोका: काय भयंकर कल्पना आहे! हॅम्लेटचा सारांश, शेवटी सगळे मरतात असा! माणसाचा सारांश शेवटी तो मेला असा काढता येईल.
झांटिपी: अरे ते सेल्फ हेल्प, व्यवस्थापकीय पुस्तकांसाठी आहे.
बोका: ह्या! त्या पुस्तकांना पुस्तकं म्हणणे हिमेश रेशमीया ला संगीतकार म्हणण्यासारखं आहे!
झांटिपी: oh the Irony! Much wit eh Sarja!
बोका: अगं, एखादं पुस्तक अभ्यासाचं उपदेशाचं झालं ना की मजाच निघून जाते सगळी. चांगली पुस्तकं रॅपीड रिडींगला लावल्यानं नावडती होतात. मुळात classics मुलांना का वाचायला लावतात? चौथीत असताना ययाती वाचायचं म्हणजे परत irony च! म्हणजे यायातीचं वार्धक्य - पुरू घेतो त्या अर्थानं.
झांटिपी: अरे चालतंय रे. मी पार संपूर्ण चातुर्मास ते रशियन कथा काय पण वाचायचे लहानपणी.
बोका: तू आहेसच चक्रम, अक्षर दिसलं की वाच असंय तुझं. माणसानं कसं मोजकंच पण दर्जेदार वाचावं
झांटिपी: पण काय दर्जेदार हे बाकीचे ठरवणार का? मग माझ्या वाचन स्वातंत्र्याचं काय?
झांटिपी: अरे आता तर वाचायची गरज च नाही, पुस्तकं श्राव्य झाली आहेत. tapes मिळतात पुस्तकाच्या. ड्राईव करताना पुस्तक, व्यायाम करताना पुस्तक. पण मला काय म्हणायचंय ऐकायच्या गोष्टी काय कमी आहेत का? लताबाईंपासून Adele पर्यंत कितीतरी! परवा मी एक पुस्तक ऐकायला घेतलं. म्हटलं असतं तरी काय ते बघितल्याशिवाय आपली मतं मांडू नयेत. तर त्या युगंधर पुस्तकाच्या टेप चा आवाजपटू ध, ष आणि ण बाबतीत कच्चा होता. एकदम हताश झाले बघ मी.
बोका: ते तर काय, त्या पेशवाई मलिकेतल्या पार्वतीबाईंनी पॉलिएस्टर पैठणी नेसली तेंव्हा पण झाली होतीस.
झांटिपी; बरोबर आहे तुझं. मी आत्ता दिलेलं उदाहरण हे त्या टेपच्या दर्जावर टीका करणारं होतं. आणि चांगल्या दर्जाची टेप तो प्रश्न सोडवू शकेल. पण माझा आक्षेप - किंवा खरंतर माझी नापसंती अधिक मुलभूत आहे. मी जेंव्हा पुस्तक वाचते तेंव्हा त्या जगाचं एक मॉडेल- एक प्रारूप माझ्या डोक्यात तयार होत असतं. ते जसं दृष्य असतं तसं ते श्राव्य ही असतं. सिंदबाद ची गोष्ट वाचताना तो सिंदबाद कसा समुद्री चाच्यासारखा दिसेल हे मी कल्पते, तसा त्याचा आवाज कसा खर्जातला आणि त्याचा लहेजा कसा रांगडा असेल हे पण मी कल्पते. आता श्राव्य पुस्तकांनी ह्या कल्पनेची गरज आणि म्हणून कल्पनेचा वाव दोन्ही संपवले. माझी कल्पना फार भारी असं नाही पण माझी आहे ना ती.
म्हणजे भा.रा. भागवतांच्या मुक्काम शेंडेनक्षत्र मधला बेन झूफ "त्रिपोलीची तलवार माझी" हे गाणं कोणत्या चालीत म्हणायचा हे पण ंमी कल्पलं ना. म्हणून पुस्तकांवरचे सिनेमे मला सहसा नाही आवडत.
(दोघांचं एकमत असल्याने, बोलायची गरज संपली. बोका आपल्या शेपटीचे निरिक्षण करू लागला, झांटिपी मुक्काम शेंडेनक्षत्र शोधायला गेली)
Comments
Post a Comment