भाईचारा

 (  सकाळच्या प्रहरी झांटिपी बाहेरचं दार उघडून गुणगुणत आत येते ) 

बोका: वाह! छान झालेला दिसतेय प्रभात फेरी. 

झांटिपी: अरे मस्त! लवकर उठायचे कष्ट सोडलेना, तर पहाटे टेकडीवर फिरायला जायला मजाच येते. ताजी हवा, झाडं पक्षी तर असतातच, शिवाय फिरायला येणारी  माणसं ही भारी असतात. 

बोका: ती कशी? 

झांटिपी: अरे कितीतरी गोष्टी सांगू शकते मी तुला. 

नेहमी फिरायला येणारी मंडळी साधारण मध्यमवयीन असतात. आणि ते सगळेजण आपल्या कमाल वेगाने चालत असतात, अथवा त्यांना असं वाटत असतं की ते कमाल वेगाने चाललेत. काहीजण त्या वेगात वाढ करण्यासाठी हाताच्या, डोक्याच्या मजेदार हालचाली करत असतात. तर त्याच्या बरोबर उलट, नुकतीच कुमारभारती वयात पोचलेली म्हणजे अकरावी-बारावीतल्या मुलामुलींची टोळी टेकडीवर टाईमपास करायला आलेली असते, त्यांना अजिबात काका दिसायचं नसतं, त्यामुळे ते अतिशय संथ गतीने चालतात.  

अजुन एक भारी दृष्य असतं प्री वेडींग शूटसाठी आलेली जोडपी, आणि फोटोग्राफर्स! 

येता जाता कानावर पडणारे संभाषणांचे तुकडे कधी अगदी टिपीकल तर कधी खूप ज्ञानात भर घालणारे असतात. 

आता आजचंच बघ ना

बोका: काय झालं आज?

झांटिपी: आज शुक्रवार असल्याने लेवल 3 गर्दीचा वार होता. नुकत्याच एक काकू मला ओव्हरटेक करून पुढे गेल्याने मी थोडीशी इरेला पडले होते, आणि वेगवर्धक हालचाली करत एका कुमारभारती टोळीला मागे टाकू बघत होते.  तर ह्या दरम्यान मला हा संवाद ऐकायला मिळाला.

त्यातली एक मुलगी वैतागून सगळ्यांना सांगत होती, "अग फार त्रास देते ग ती मला, लहान म्हणून किती ऐकून घ्ययचं. सारख्या आईला चहाड्या, चौकश्या आणि ही पण येणार! काल तर माझ्या मोबाईलवर माझे चॅट वाचायला लागली, असला राग आला ना मला. वाटलं द्यावे दोन ठेवून, पण बहीण पडते ना!"

त्यावर तिच्या एका मित्राने - त्या वयाच्या मुलांनाच असणाऱ्या "I know it all" कॉन्फिडन्सनं सांगितलं

"लहान बहिणींच काय मला माहित नाय पण लहान. भावांना. फटके. द्यावेच. लागतात." (त्याच्या वाक्याच्या फेकीत प्रत्येक शब्दानंतर पूर्णविराम होता.)

आणि त्यावर हे जगातलं आर्यसत्य असावं अश्या गंभीरपणे उरलेल्या गॅंगने मान हलवली. 

मला वाटतं जगातल्या सगळ्या मोठ्या भावा-बहिणींचा अनुभव त्या वाक्यात एकवटला होता! 


Comments