पाऊस, कविता आणि बेडूक

 झांटिपी:  कसा मस्त पाऊस लागलाय बघ! सरीवर सरी

बोका: हो, ओली झाडं आणि हवेला पावसाळी वास.

झांटिपी: तुला माहितेय बोक्या, प्रत्येक गावातला पाऊस वेगवेगळा असतो. मुंबईचा पाऊस हत्तीधारांनी कोसळतो, एकदा लागला की दिवस दिवस खंड नाही. पुण्यातला पाऊस आबदार सरींनी पडतो, मध्येच पटकन सायकलवर जाऊन एक वडापाव - कटींग जमवायची उसंत ही देतो. तर महाबळेश्वरी, आपण ढगातच असतो. आपल्या आसपास चे ढग पाण्याने अधिक अधिक संपृक्त होतात, आणि भरली घागर ओसांडावी तसा पाऊस सुरू होतो, थांबतो, थोडे रिते ढग परत भरू लागतात. 

बोका:  जसा लंडनचा पाऊस जाणवत नाही पण कोट मात्र ओला होतो, म्हणून  Shakespere लिहितो 

The quality of mercy is not strained;

It droppeth as the gentle rain from heaven

करूणा ही देवाघरच्या अल्वार पावसासारखी आहे, घेणाऱ्याला नकळत ती भिजवते. आता विल्यमपंत भारतातल्या पावसात भिजत असते तर त्यांना ही 'नकळत' प्रतिमा सुचलीच नसती. न्याय़ हा पावसासारखा असतो असं म्हणाले असते कदाचित ते. 

झांटिपी: संगम साहित्यात ही अश्याच छान पावसाच्या कविता आहेत.

बोका: संगम म्हणजे तामिळ साहित्याचं सांगते आहेस तू?

झांटिपी:इ स पूर्व दुसरे शतक ते इ स दुसरे शतक, हा संगम साहित्याचा काळ. चोल, चेर आणि पांड्य राज काल. तामीळ कवींचे तीन संघ (संगम) या काळात बनले. त्यांनी उत्तम साहित्य संकलित केले. ते आहे संगम साहित्य.  आगम कवितांमध्ये कवीची नाममुद्रा नसते त्यामुळे, जो वाचेल त्याची ती कविता आहे.ह्या कविता पाच भागात विभागलेल्या आहेत. डोंगर कविता(Kurinji), जंगल कविता(Mullai), माळ कविता(Marutham), सागर कविता(Neithal) आणि अधल्यामधल्याकविता(Palai).

प्रत्येक विभागात, त्या त्या भागतल्या लोकांचे, निसर्गाचे वर्णन  आहे. त्या भागांची नावे ही तिथल्या फुलांची आहेत.प्रत्येक भागाला स्वत:चा ताल, वाद्य, काल आहे. ह्या कवितांचे आठ संग्रह आणि दहा दीर्घ कविता मिळून बनते संगम साहित्य.

बोका: म्हणजे आपल्या आधी २000 वर्ष, ह्या पृथ्वीवर वावरलेल्या जीवांनी हे लिहिलंय!

झांटिपी: हो रे, ही बघ अशीच एक सुंदर कविता - पावसाची आणि प्रेमाची ...
ही Ainkurunooru संग्रहातली २0६ वी कविता Kurinjikoi म्हणजी डोंगरगाण्यांपैकी एक, एक नायिका आपल्या सखीला म्हणते,
 "Long live my friend! Listen!
 Look at him who has come!
Shining sword wet with raindrops,
Striped belt cool with dewdrops;
As a sentinel of the rainy hills
 Anklets of valor covered with moss;"
  “ऐक सखे,
बघ तर कोण आलंय  ते,
पाऊसओली लखलखती तलवार,
तुषारांनी शिवरलेला कमरबंद
 आलाय जणू पावसाळी डोंगरांचा शिलेदार,
पायीचं  इनामी कडं शेवाळानं  माखत"

बोका: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
इस पूर्व आणि इस नंतर सगळं सेम असतं. 
पाऊस पडला की बेडूक ओरडायला लागतात आणि पुरंध्य्रा कविता करायला.

Comments