हमिनस्त , हमिनस्त , हमिनस्त

         

             उर फुटेल असा दम लागला असतो. तुम्ही धापा टाकत वर चढत असता. मान मोडेपर्यंत वर बघितले तरी गडाचा माथा दिसत नाही. एवढी तंगडतोड करत आल्याचा पश्चातापही होत असतो पण you never give up.
          Yes मी गड चढायची गोष्ट करणार आहे. दोन वर्षांपूर्वी  नवऱ्याच्या company मधील उत्साही लोकांनी दर महिन्याला ट्रेक करायची टूम काढली. वाढते वय आणि वाढते आकारमान ह्यामुळे जमणार नाही असे वाटायचे पण एकदा त्यातील मज्जा कळल्यावर there was nothing like it.

           ह्या ट्रेक्स मध्ये सर्वात अविस्मरणीय ट्रेक अंधारबनचा होता. ताम्हिणी घाटातून सुरू होणारा हा ट्रेक पूर्वीच्या काळातील घाटमाथ्यावरून कोकणातील बंदरापर्यंत जाणारा व्यापार मालासाठी असलेला रस्ता. ठिकठिकाणी कोसळणारे धबधबे आणि भले मोठे कडे. आमच्या guideने आधीच सांगितले selfie काढायच्या नादात खूप कडेला जाऊ नका नाहीतर direct कोकणातच जाल. हा पूर्ण ट्रेक उतरणीच्या रस्त्याचा आहे. ह्या भागात एवढी झाडी आहे की सूर्याची किरणे खाली पोचू शकत नाही. म्हणूनच त्याचे नाव अंधारबन. ह्या ट्रेकचा शेवट भीरा धरणाजवळ होतो. पूर्ण उतरल्यावर एखाद्या postcardवर टाकावा असा ओढा आणि त्यावर japnese pictures मध्ये शोभेल असा लाकडी पूल. कोणाचाही घरी जायला पाय ही निघत नव्हता.

            ट्रेकमध्ये अजून एक मजा असते ती स्थानिक लोकांची.  वाटतेत भेटणाऱ्या ताई, दादा, मावशी, काका किंवा आज्जीला विचारले, “काय हो किती वेळात चढून होइल?” ते अगदी आरामात म्हणतात,”२० मिनिटे.” २० मिनिटात काही चढून नाही होत. त्यांना जर विचारले की स्वर्ग अजून किती दूर आहे तर ते नक्की म्हणतील ,”20 मिनिटे”


           असे म्हणत म्हणत रायरेश्वर - केंजळगडचा 21 km  चा circuit केला. राजगड,तुंग, तिकोणा, कोथळीगड, विसापूर , कोराईगड , सुधागड , लोहगड ,मकरंदगड आणि प्रबळगड असे एक एक गड पालथे घातले.

            ट्रेक मध्ये आम्ही कडक उन्हात फिरतो , धो धो पावसात दिवसभर फिरतो,ठेचकाळतो ,पडतो . Biselery शिवाय पाणी न पिणारे हिरव्यागार टाक्यांमधून आणि वाहणाऱ्या ओढ्यातून पाणी पितात. पण ह्या गोष्टी कधी कोणालाही बाधत नाही. कदाचित अंगाखांद्यावर बागडणार्याऐ लेकरांवर सह्याद्रीची माया असेल.

           संध्याकाळ झाली की खाली उतरायचे वेध लागतात. अंगातील अणूरेणू दमलो दमलो म्हणून किंचाळत असतात. खाली उतरताना एकटे असता. सांजवात कानाशी फरफरत असतो.दूरवर मधून मधून ऐकू येणारा लाउडस्पीकरचा आवाज मनुष्यवस्तीची आठवण करून देतो. संध्याकाळची उन्हे लांब डोंगररांगांबरोबर सावल्यांचा खेळ खेळत असतात. सकाळपासून बघितलेली निसर्गाची वेगवेगळी रुपे आठवून मनाला हुरहूर लावत असतात. अश्या वेळी  असे वाटते हा सह्याद्री आपल्याला कवेत घेणार . तो सोनेरी प्रकाश तुम्हाला अंतर्बाह्य cleanse करतो. अशा वेळी कोणी मला कोणी विचार ले की स्वर्ग कुठे आहे तर मी नक्की उत्तर देईन ,” हमिनस्त , हमिनस्त ,हमिनस्त “ (इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे)






Comments